
बीड, 19 डिसेंबर, (हिं.स.)। धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०-अ साठीची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन कारणामुळे लांबल्याने शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या प्रभागातील भाजपचे उमेदवार अजय गायसमुद्रे यांचा अर्ज सुरुवातीला अवैध ठरवण्यात आला होता. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज वैध ठरविल्याने निवडणूक विभागाने या प्रभागातील मतदान प्रक्रिया थांबवून ती नव्याने २० डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग १०-अ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, या प्रभागात एकूण १७१० मतदार आहेत. पुन्हा मतदानाची संधी मिळाल्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच उमेदवार प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीकडून अजय गायसमुद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मण सिरसर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून अक्षय वैरागे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून अशोक सिरसट हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकूण पाच उमेदवारांमध्ये ही लढत रंगणार आहे. मतदानाची तारीख जवळ आल्याने अवघ्या दोन दिवसांत प्रचाराचा जोर वाढला असून, प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी मतदान नसले, तरी नगरसेवक पदासाठीची ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis