
पालघर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत वाकसई अंतर्गत रावळेपाडा येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, याबाबत केळवेरोड विभागातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. नादुरुस्त स्मशानभूमीमुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर तालुका अध्यक्ष संदीप किणी यांनी नुकतीच स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्मशानभूमीच्या दुरुस्तीबाबत विचारणा केली. मात्र यावेळी प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप किणी यांनी केला.
संदीप किणी यांनी सांगितले की, जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी नादुरुस्त स्मशानभूमींच्या दुरुस्तीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही या आदेशांचे उल्लंघन होत असेल, तर ते अत्यंत गंभीर आणि अयोग्य आहे.
“पाच दिवसांच्या आत स्मशानभूमीची दुरुस्ती न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा संदीप किणी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL