
परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)। मोबाईलच्या अतिरेकामुळे युवकांची एकाग्रता, वाचन, अभ्यास, कुटुंबातील संवाद व संस्कार कमी होत चालले आहेत. त्यातून निराशा, व्यसनाधीनता, हिंसक प्रवृत्ती आणि सामाजिक तुटकपणा वाढत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. एम. एम. सुरनर यांनी केले.
राणीसावरगांव येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा यो जना विभागातर्फे मोजे इळेगाव येथे आयोजित विशेष वार्षिक शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव धापसे होते. व्यासपीठावर डॉ. तुकाराम बोबडे, डॉ. कालिदास गुडदे, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. अंगद गडमे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. सुरनर पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात युवकांची मानसिक व सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. उद्योग, नोकरी आणि करिअरमधील वाढती स्पर्धा यामुळे युवकांमध्ये ताणतणाव वाढून दिशाभ्रम निर्माण होत आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे युवकांची एकाग्रता, वाचन, अभ्यास, कुटुंबातील संवाद व संस्कार कमी होत चालले आहेत. त्यातून निराशा, व्यसनाधीनता, हिंसक प्रवृत्ती आणि सामाजिक तुटकपणा वाढत आहे. आज संपूर्ण जग मोबाईलच्या जाळ्यात अडकले आहे. भविष्यातील पिढी वाचवायची असेल तर पालक व शिक्षकांनी एकत्र येऊन मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हीच मोठी शिक्षा समजून शिक्षकांनी कार्य केले पाहिजे आणि त्यासाठी पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या पिढीत नैतिकता, मूल्ये, कृतज्ञता, संयम व जबाबदारी यांचा र्हास होत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. संस्कार देण्याची मूलभूत जबाबदारी प्रथम आई-वडिलांची, त्यानंतर शिक्षक व समाजाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. तुकाराम बोबडे व डॉ. कालिदास गुडदे यांनीही आपले विचार मांडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis