पालघर - आयएसओ मानांकित शाळा तीन वर्षांपासून शिक्षकविना
पालघर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील जिल्हा परिषद मराठी शाळा कांद्रेभुरे येथे मागील तीन वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने शाळेची शैक्षणिक परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या सहा महिन्यांपासून एकही कायमस्
आयएसओ मानांकित शाळा तीन वर्षांपासून शिक्षकविना!  शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे कांद्रेभरे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर


पालघर, 19 डिसेंबर, (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील जिल्हा परिषद मराठी शाळा कांद्रेभुरे येथे मागील तीन वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने शाळेची शैक्षणिक परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या सहा महिन्यांपासून एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्यामुळे पालकवर्गाने यावर्षी तब्बल २० विद्यार्थ्यांना सात किलोमीटर अंतरावरील अन्य शाळांमध्ये दाखल केले आहे. परिणामी, गेल्या तीन वर्षांत एकूण ५० विद्यार्थ्यांची संख्या घटली असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेली ही शाळा आयएसओ मानांकित असतानाही शिक्षण विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत कांद्रेभरे व शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. तीन वर्षांपासून ग्रामपंचायत व पालकवर्गाकडून शिक्षक नियुक्तीसाठी पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही.

सध्या तात्पुरत्या स्वरूपात पाठवण्यात आलेले दोन शिक्षक हे पेसा अंतर्गत कंत्राटी असल्याने शाळेचा अधिकृत चार्ज घेण्यासाठी कोणताही कायम शिक्षक नेमण्यात आलेला नाही. दरवर्षी शिक्षक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.“जर शिक्षक नेमायचे नसतील तर शाळेची जबाबदारी पालकांनी घ्यायची का?” असा सवाल उपसरपंच दुर्गेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.

या शाळेत आदिवासी तसेच गरीब-गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असून सात किलोमीटरचा प्रवास सर्वांसाठी शक्य नाही. त्यामुळे गरीब पालक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कांद्रेभरे ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे 15 डिसेंबर रोजी लेखी स्वरूपात तातडीने कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची शेवटची विनंती केली आहे. अन्यथा सर्व विद्यार्थी व पालक शिक्षण विभागाच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande