
परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)।
आजच्या काळात माणसाचा फक्त मेंदू वाढला पण मनाचा हवा तसा विकास झाला नाही. मनाची प्रगती ही काळाची गरज असून आत्मिक प्रगती महत्त्वाची आहे. आनंदी जीवनासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री, साहित्यिक तथा मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.
येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘चला जगूया ऐसें जीवन’ या विषयावर प्रशालेच्या स्व. अॅड. वसंतराव खारकर सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री तथा प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई येथील डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गुंफले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिरुद्ध जोशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेश खारकर हे होते.
पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, वाणी ही माणसाला एक तर सुखी करते किंवा दुःखी करते. म्हणून शब्द जपून वापरा. जो घरच्या स्त्रीचे कौतुक करतो तो सुखी होतो. जगण्याचा मार्ग आपल्या सकारात्मक दृष्टीने आपण सोपा करू शकतो. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट करा. आनंदी जीवनासाठी मनातल्या, भावनांच्या गाठी सोडवने आवश्यक. ज्याचे मन सुंदर त्याचे जीवन सुंदर असते. कुटुंबाला वेळ द्यायला हवा. आनंद वाटता यायला हवा. तर जीवन सुखी होते, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ मंजूषा कुलकर्णी यांनी स्वलिखित पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली. अध्यक्षीय समारोप अॅड. जोशी यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis