
पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून उसरणी गाव परिसरात बिबट्याचे दर्शन होत असून त्याचे ठसेही आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वन विभाग आणि उसरणी गावातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
उसरणी येथील विकास गावड यांच्या दोन बकर्या गुरुवारी बेपत्ता झाल्या होत्या. त्याच दिवशी विकास गावड व सागर बेंदर यांना शेत परिसरात बिबट्या दिसून आला होता. या ठिकाणी शुक्रवारी वन विभाग व ग्रामस्थांनी संयुक्तपणे पाहणी केली असता, त्या परिसरात एका बकरीची बिबट्याने शिकार केल्याचे स्पष्ट निदर्शनास आले.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी शुक्रवारी कॅमेरा ट्रॅप बसवण्यात येणार असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.
दरम्यान, वन विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रात्री व पहाटे एकटे शेतात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, लाकूड किंवा चुलीसाठी साहित्य गोळा करताना सावधगिरी बाळगावी तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने वन विभाग किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL