
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. तहसील कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी प्रशासनाकडून सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषद निवडणुकीतील एकूण ११ प्रभागांसाठी स्वतंत्र ११ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले आहेत
प्रभागनिहाय मतमोजणीच्या फेऱ्यांचेही निश्चित नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ६ साठी ४ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे, तर प्रभाग क्रमांक ११ साठी सर्वाधिक म्हणजे ५ फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार आहे. उर्वरित सर्व प्रभाग क्रमांकांसाठी प्रत्येकी ३ फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी स्पष्ट नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी अधिकृत पास आवश्यक असून, पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नगरसेवक (सदस्य) पदाच्या प्रत्येक उमेदवाराला केवळ एकाच मतमोजणी प्रतिनिधीची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रत्येक टेबलवर एक अशा एकूण ११ मतमोजणी प्रतिनिधी नेमण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे सर्व प्रभागांतील मतमोजणीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे थेट लक्ष राहणार आहे.
कोणत्या प्रभागात कोण बाजी मारणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २१ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रात मोबाईल मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केंद्रात प्रवेश करताना सर्वांची तपासणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis