
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना जबाबदारीचे वाटप महापालिकेच्या राजीव गांधी भवनात बैठकीत करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीस यंत्रणेला तातडीने संवेदनशील केंद्र निश्चीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक महापालिकेच्या निवडणूकीसंदर्भात महानगर पालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करणे, स्ट्राँग रूम येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवणे, तसेच वाहन तपासणी मोहीम राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या विविध समित्यांनी त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
अग्रणी बँक व्यवस्थापकांना निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारांच्या बँक खात्यांतील आर्थिक उलाढालीची नियमित तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. वाहतूक शाखेने प्रचार रॅलीसाठी रीतसर परवानगी देताना शहरातील वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच शहरातील प्रमुख मैदानांवर होणाऱ्या सभांसाठी पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिका यांच्यातील परवानगी प्रक्रियेत समन्वय राखण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक अमृत तांबारे, प्रादेशिक परिवहन विभागाचे सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले, लीड बँक मॅनेजर भिवा लवाटे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक सविता सदावर्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV