रायगड :कशेळे–कवठेवाडी खिंडीत दोन्ही जखमी
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। कशेळे–कवठेवाडी खिंडीत रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे भीषण अपघात घडला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका दुचाकी वाहनचालकाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मो
खड्डा ठरला अपघाताचा कारण! कशेळे–कवठेवाडी खिंडीत दोन्ही जखमी


रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। कशेळे–कवठेवाडी खिंडीत रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे भीषण अपघात घडला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका दुचाकी वाहनचालकाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनचालक जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग घाटाचा व वळणावळणाचा असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलेला असून तो अपघाताला आमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याच खड्ड्यामुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून समोरासमोर धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर जखमी दोघांना तत्काळ कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या अभिजीत याला पुढील उपचारासाठी रायगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, निकृष्ट डागडुजी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande