
पालघर, 19 डिसेंबर (हिं.स.)। कुणबी समाजाच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभाग यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम २०२५–२६ ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेचे स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालय, लालोंडे येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. प्रणव अशोक सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून भालचंद्र पाटील, सुनील शेलार, चंद्रशेखर नाईक उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित कुणाल अशोक ठाकूर व प्रमुख पाहुणे प्रणय यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी समाजातील विविध शैक्षणिक स्तरांवर उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी आणि शैक्षणिक नियोजनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
‘अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र’ या विषयावर प्रा. संजय घरत यांनी दहा मुद्द्यांच्या आधारे बहुमोल मार्गदर्शन केले. अभ्यासाची शिस्त, प्रार्थना, व्यायाम, संवादकौशल्य, मनोरंजन, मनन-चिंतन, वेळापत्रक, आहार व स्वच्छता, पुरेशी झोप आणि दृढनिश्चय यांचा समतोल साधल्यास तसेच स्वतःतील कौशल्यांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना यश मिळविणे निश्चितच सुलभ होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त चेतन पाटील, उल्हास सातवी, मनोज ठाकूर, माजी अध्यक्ष मार्तंड पाटील, अविनाश पाटील, ज्ञातीचे अध्यक्ष यदुनाथ पाटील, जगदीश पाटील, उद्योजक मनोज अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर अधिकारी, विद्यमान व माजी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, गट चिटणीस, महिला प्रतिनिधी तसेच समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL