
- नशा विरोधी संघर्ष अभियानची मागणी
मुंबईत शिवड़ी येथे होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टिवल प्रचंड वादात सापडला आहे. नशा विरोधी संघर्ष अभियान तसेच अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक यांचा होणारा प्रचंड विरोध डावलून या कार्यक्रमाला परवानगी देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. हा प्रश्न केवळ संगीत महोत्सवाचा नाही, तर नशा, कायदा, बालसुरक्षा आणि प्रशासनाच्या भूमिकेचा आहे. विविध संघटनांनी अनेक आंदोलने, निदर्शने, निवेदने देऊनही व्यसनाधीनतेला पाठबळ देणारे कार्यक्रमांना सर्रास परवानगी मिळते हे निषेधार्ह आहे. देश नशेच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्याऐवजी अशा कार्यक्रमांना परवानगी देणारे झारीतील शुक्राचार्य शोधून त्यांच्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात नशा विरोधी संघर्ष अभियानच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी 'मोकळा श्वास फाउंडेशन'चे संयोजक श्री. राजेश सावंत हे उपस्थित होते.
नशा विरोधी संघर्ष अभियान च्या वतीने गेले महिनाभर सुरु असलेल्या सनबर्न विरोधी मोहिमेसंदर्भात उपस्थितांना माहिती सौ. केळशीकर यांनी यावेळी दिली. त्या पुढे म्हणाल्या 'अभियाना'च्या वतीने आजवर ५० हून अधिकी महाविद्यालयात प्रबोधन केले गेले असून शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहचला. मुंबईचे पोलीस आयुक्त, नार्कोटिक डिपार्टमेंटचे उपायुक्त, मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस यांना प्रत्यक्ष भेटून या कार्यक्रमांवर बंदी घालावी यासाठी असे आवाहन केले. परंतु या सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून आम्हाला अत्यंत दुर्लक्षित प्रतिसाद मिळाला हे धक्कादायक आहे. उदा. नार्कोटिक विभागाच्या अधिकाऱ्यांना drunk and drive प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असता, त्यांनी “आता लोक ओला-उबेरने येतात, त्यामुळे तो प्रश्नच नाही.” असे उत्तर मिळाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलीस आणि राज्याचे मुख्य सचिव यांना या कार्यक्रमाबद्दल पाठवलेल्या नोटिशीला साधे उत्तर देण्याची तसदी सुद्धा यांनी घेतलेली नाही. त्यामुळे एकंदर हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे असे आढळून येते. सनबर्नचा आपराधीक इतिहास आणि व्यसनाधीनतेला पाठीशी घालणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रशासनाकडून मिळलेले पाठबळ पाहता झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याचा तपास होऊन संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. आम्ही संगीत किंवा करमणुकीविरोधात नाही, पण नशा, ड्रग्स आणि कायद्याच्या उल्लंघनाविरोधात ठाम आहोत. शांत, कायदेशीर मार्गाने विरोध करणे हा आमचा हक्क आहे. सरकार व प्रशासनाने जबाबदारीने वागले पाहिजे असेही त्या शेवटी म्हणाल्या.
सनबर्न होणार असलेल्या परिसराच्या जवळ आम्ही शांत व कायदेशीर मार्गाने निदर्शन करण्यासाठी परवानगी मागितली असता पोलिसांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला कि “येथे आंदोलन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल.” यानंतर केवळ मूक निदर्शनाची परवानगी मागण्यात आली, आचारसंहितेचे कारण पुढे करून निदर्शने करता येत नाहीत पण अशा कार्यक्रमांना मात्र परवानगी मिळते हे दुटप्पीपणाचे लक्षण आहे. प्रशासनाकडे वारंवार केलेल्या तक्रारीनंतर सुद्धा या कार्यक्रमात काही अघटित घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असेही सौ. केळशीकर यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी 'मोकळा श्वास फाउंडेशन'चे संयोजक श्री. राजेश सावंत म्हणाले, 'येणारी पिढी नशेच्या आहारी जाऊ नये यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत. महाविद्यालयात व्यसनाधीनता वाढत आहे. सनबर्नसारख्या प्रकारच्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी आणावी'.
नशा विरोधी संघर्ष अभियानच्या वतीने खालील मागण्या शासनाकडे करण्यात येत आहेत.
1. सनबर्न संदर्भातील सर्व परवानग्यांची सार्वजनिक माहिती द्यावी.
2. या कार्यक्रमांच्या तपासणीसाठी NDPS Act अंतर्गत स्वतंत्र तपास यंत्रणा नेमावी.
3. NHRC ला तात्काळ संपूर्ण अहवाल सादर करावा.
4. शांततापुर्ण निदर्शनांवरील बंदी त्वरित मागे घ्यावी.
5. अल्पवयीनांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येऊ नये.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी