नाशिकमध्ये ‘सौभाग्याचं शपथपत्र’ अभिनव उपक्रम
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। : समाजातील महिलांवर, विशेषतः पतीच्या निधनानंतर लादल्या जाणाऱ्या अमानवी, अवैज्ञानिक व अन्यायकारक प्रथा नाकारत स्त्रीसन्मान, समानता व मानवी हक्कांचे मूल्य अधोरेखित करणारा ‘सौभाग्याचं शपथपत्र’ हा अभिनव उपक्रम जिल्हा परि
ते देताय एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र कायम साथ देण्यासाठी


नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। : समाजातील महिलांवर, विशेषतः पतीच्या निधनानंतर लादल्या जाणाऱ्या अमानवी, अवैज्ञानिक व अन्यायकारक प्रथा नाकारत स्त्रीसन्मान, समानता व मानवी हक्कांचे मूल्य अधोरेखित करणारा ‘सौभाग्याचं शपथपत्र’ हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद नाशिकच्या ‘नवचेतना अभियान’ अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या शपथपत्रात पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नाशिक तालुक्यातील चांदशी ग्रामपंचायत अंतर्गत विविध धर्मीय २० पती-पत्नींनी स्वेच्छेने सहभाग घेत ‘सौभाग्याचं शपथपत्र’ स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा आणणाऱ्या रूढी, परंपरा व कुप्रथा यांना ठामपणे नकार देणे व भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांचा स्वीकार करणे हा आहे. महात्मा ज्योतिराव फुले व लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रबोधनपर विचारधारेतून प्रेरणा घेत स्त्रीसमानता, विवेकवाद व सामाजिक न्याय यांवर आधारित ही शपथ घेण्यात आली. शपथपत्राद्वारे सहभागी दांपत्यांनी महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याची, महिलेला दुय्यम ठरवणाऱ्या कुप्रथांना कोणतेही समर्थन न देण्याची तसेच कुटुंब, गाव व समाजपातळीवर जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष आचरणात व कृतीत उतरविण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पतीच्या निधनानंतर स्त्री एकटी असली तरी ती पूर्ण आहे, कोणत्याही पतीला आपल्या पत्नीचे मंगळसूत्र तोडणे, कुंकू पुसणे यासारख्या गोष्टी आवडणार नाहीत, या भावनेतून ग्रामपंचायत अधिकारी श्री. विनोद शशिकला सुधाकर अहिरे व त्यांची पत्नी सौ. राजश्री विनोद अहिरे यांनी ‘सौभाग्याचं शपथपत्र’ स्वीकारत समाजासमोर आदर्श उदाहरण निर्माण केले. विनोद अहिरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन अभिनव उपक्रमाची माहिती दिली, याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी अहिरे दाम्पत्याचे अभिनंदन केले, यावेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, या उपक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला, त्यामुळे हा उपक्रम सर्वसमावेशक सामाजिक सुधारणेचा संदेश देणारा ठरला. स्त्रीसन्मान व मानवी मूल्ये ही कोणत्याही एका धर्माची अथवा समूहाची नसून ती सार्वत्रिक आहेत, हा सकारात्मक संदेश या माध्यमातून समाजात पोहोचला. ‘नवचेतना अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणारे असे उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देणारे असून समाजातील विचारप्रवाह बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सिन्नर मधील गुळवंच व नाशिक मधील चांदशी ग्रामपंचायतीतील ‘सौभाग्याचं शपथपत्र’ उपक्रम हा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, भविष्यात इतर ग्रामपंचायतींनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार म्हणाले की, महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा आणणाऱ्या कुप्रथांना नकार देणे ही काळाची गरज आहे, सौभाग्याचे शपथपत्र उपक्रमातून समाजात स्त्री पुरुष समानतेची जाणीव निर्माण होत असून हा बदल प्रत्येक कुटुंबातून स्वेच्छेने व्हायला हवा.

. ---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande