
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेत येथील फिनोलेक्स ॲकॅडमीने सादर केलेल्या 'तुकारामाची टोपी' या एकांकिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.फिनोलेक्स महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक व नाट्यकलेच्या क्षेत्रातही आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. अलीकडील विविध प्रतिष्ठित नाट्यस्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विभागीय एकांकिका स्पर्धेत महाविद्यालयाने तुकारामाची टोपी या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक हा मानाचा पुरस्कार पटकावले आहे. 'तुकारामाची टोपी' या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती गायत्री शिंदे हिने व सर्वोत्कृष्ट अभिनय, प्रसाद फडके याने हा मान मिळवला आहे.फिनोलेक्स ॲकॅडमीची एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एल. डी. नाईकनवरे, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव यांनी मार्गदर्शन केले. एकांकिका लेखन व दिग्दर्शनासाठी यश मोडक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी