गडचिरोली जिल्ह्यातील ४ प्रभागांसाठी शनिवारी मतदान
गडचिरोली, 19 डिसेंबर (हिं.स.) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण चार प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गडचिरोली नगरपरिषदेतील तीन तर आरमोरी नग
गडचिरोली जिल्ह्यातील ४ प्रभागांसाठी शनिवारी मतदान


गडचिरोली, 19 डिसेंबर (हिं.स.) नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण चार प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गडचिरोली नगरपरिषदेतील तीन तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागाचा समावेश असून, या निवडणुकीसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

या निवडणुकीत एकूण १२ हजार ५९२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रभाग १(अ) मध्ये ३,१३९, प्रभाग ४(ब) मध्ये ३,५७२ तसेच प्रभाग ११(ब) मध्ये ४,१९४ असे एकूण १०,९०५ मतदार असून, आरमोरी नगरपरिषदेच्या प्रभाग १०(अ) मध्ये १,६८७ मतदारांचा समावेश आहे.

गडचिरोली नगरपरिषदेतील तीन प्रभागांसाठी ११ मतदान केंद्रे तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी ३ मतदान केंद्रे अशी एकूण १४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी गडचिरोली येथे दोन आणि आरमोरी येथे एक असे एकूण तीन क्षेत्रीय अधिकारी (झोनल अधिकारी) नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी मतदान पथके सज्ज असून त्यांचे अंतिम प्रशिक्षण शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आले आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहणार आहे. जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी मतदारांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande