
पुणे, 19 डिसेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विकासकामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व सोई-सुविधा) याचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, महसूल, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देवस्थान यांच्यात समन्वय ठेवून कामकाजाचे सविस्तर नियोजन करावे. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजन व गर्दी व्यवस्थापनाबाबत स्पष्ट आराखडा सादर करावा, तसेच नियंत्रण कक्ष उभारण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीणचे उपअधीक्षक दिलीप शिंदे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने, भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु