
पुणे, 19 डिसेंबर, (हिं.स.)। भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत उघडपणे टीका करणारे महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपाच्या चर्चेपासून गुरुवारी दूर ठेवण्यात आले. या बैठकीत महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष युती म्हणून महापालिकेची निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, शिवसेनेला २५ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असणार आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना युतीची निवडणुकीची तयारी आणि संभाव्य जागावाटप याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी आमदार धंगेकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु