रायगडमध्ये अल्पसंख्यांक विकासासाठी ५० कोटींच्या ५५ कामांना मंजुरी
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील मुस्लिम, जैन आणि बौद्ध समाजासाठी दिलासादायक व महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत सुमारे ५० कोटी रुपयांच्या तब्बल ५
रायगडच्या मुस्लिम, जैन व बौद्ध समाजासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा


रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील मुस्लिम, जैन आणि बौद्ध समाजासाठी दिलासादायक व महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत सुमारे ५० कोटी रुपयांच्या तब्बल ५५ विकासकामांना तत्वत: मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

राज्यसभा खासदार व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अल्पसंख्यांक विकासासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आहे. खासदार धैर्यशील पाटील आणि भाजप जिल्हा महामंत्री सतीश धारप यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री किरेन रिजीजू यांची संसद भवनातील मंत्री दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान रायगड जिल्ह्यातील मुस्लिम, जैन व बौद्ध समाजासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेनंतर अलिबाग येथे मुस्लिम समाजासाठी ३ कोटी रुपयांचे सामाजिक संकुल उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अलिबाग, पेण, पनवेल आणि महाड येथे जैन समाजासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची सामाजिक संकुले उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय महाड तालुक्यात बौद्ध समाजासाठी १० कोटी रुपयांचे भव्य सामाजिक संकुल उभारले जाणार आहे.

पाली शहरात मुस्लिम समाजासाठी १ कोटी रुपयांचे शादीखाना तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत गावात मुस्लिम समाजासाठी सामाजिक संकुल उभारण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. एकूण ५५ विकासकामांसाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.

या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक उपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीला मोठे बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande