
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.)।चिखलदरा येथेच साहसी खेळाची अकॅडमी उभारण्यात येणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच कोलकास येथे कोरकू यांच्या जीवनावर आधारीत केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पायाभूत सुविधा आणि चिखलदरा पर्यटनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉक उभारण्यात येत आहे. स्कायवॉक उभारणीत अडचणी आल्याने काम पूर्ण करण्यासाठी स्कायवॉकच्या मध्यभागी जमिनीतून आधार देणे आवश्यक आहे. यासाठी तात्पुरता पाया उभारण्यात येणार आहे. गोल रस्त्याचे काम करण्यात येणार असून यात वन विभागाच्या जागेवर तोडगा काढण्यात येणार आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सादरीकरण करण्यात आले. चिखलदरा येथे येणारा पर्यटक याठिकाणी थांबावा, यासाठी लाईट इफेक्ट गार्डनची सूचना करण्यात आली. मात्र याठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असल्याने ही बाब तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. गाविलगड किल्ल्याचा विकास पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करावा. आमझरी हे मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे येथे प्रशिक्षण आणि इतर सुविधा उभारण्यात याव्यात. यासोबतच मेळघाटातील २२ गावांमध्ये वीज पोहोचण्यासाठी वनविभागाच्या सर्व परवानगी घ्यावी. पीएम मित्रा पार्कमध्ये विज उपकेंद्रासाठी जागा मिळणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. मोर्शी आणि वरूड भागासाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात यावी. याठिकाणी कार्यरत जैन आणि एमकेसी यांच्यासोबत समन्वय राखण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी