मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी खा. डॉ. गोपछडे यांचे संसदेत भरीव प्रयत्न
नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भरीव प्रयत्न सुरू केले आहेत नांदेडला रेल्वे जंक्शन म्हणून विकसित करण्यापासून वंदे भारत, अमृत भारत, तीर्थक्षेत्र व औद्योगिक कनेक्टिव्ह
मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी खा. डॉ. गोपछडे यांचे संसदेत भरीव प्रयत्न


नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भरीव प्रयत्न सुरू केले आहेत

नांदेडला रेल्वे जंक्शन म्हणून विकसित करण्यापासून वंदे भारत, अमृत भारत, तीर्थक्षेत्र व औद्योगिक कनेक्टिव्हिटी तसेच नव्या रेल्वेमार्गांच्या उभारणीपर्यंत बहुआयामी पुढाकार घेतला आहे.

मराठवाड्याच्या सर्वांगीण रेल्वे विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाकडे अनेक महत्त्वपूर्ण व दूरगामी प्रस्ताव प्रभावीपणे मांडले. नांदेडला आधुनिक रेल्वे जंक्शन म्हणून विकसित करणे, तीर्थक्षेत्रे व औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी भक्कम करणे, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच नव्या रेल्वेमार्गांच्या उभारणीला चालना देणे , या दृष्टीने हे प्रयत्न विशेष उल्लेखनीय मानले जात आहेत.

हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील वाढता प्रवासी भार आणि आगामी नांदेड–यवतमाळ–वर्धा नव्या रेल्वेमार्गाचा विचार करता, स्थानकावर दोन नवीन प्लॅटफॉर्म्सच्या उभारणीसह नांदेड (माळटेकडी) येथे वंदे भारत कोचिंग व मेंटनन्स डेपो स्थापन करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची ठोस तरतूद करण्याची मागणी डॉ. गोपछडे यांनी केली. यामुळे रेल्वे संचालनातील कार्यक्षमता, वेळपालन आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

मराठवाड्याची जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी नांदेड–पुणे तसेच हैदराबाद–नांदेड वंदे भारत गाड्यांचे तातडीने संचालन, नांदेड–पाटणा व नांदेड–अमृतसर अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर, बोधन–बिलोली–नरसी–लातूर रोड, नांदेड–लातूर रोड आणि नांदेड–बिदर हे पर्यटन व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे नवे रेल्वेमार्ग लवकरात लवकर मंजूर करून त्यासाठी पुरेसा अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः नांदेड–बिदर रेल्वेलाइनबाबत कर्नाटक शासनाची सहमती मिळविण्यासाठी केंद्र सरकारने सक्रिय पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तीर्थक्षेत्र व पर्यटन कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देत पीठापूरम या प्राचीन तीर्थस्थळी नांदेड–विशाखापट्टणम व नांदेड–संबलपूर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची, तसेच धर्माबाद स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा स्टॉपेज देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, पंढरपूर–नांदेड–निजामाबाद गाडीचा विस्तार तिरुपतीपर्यंत करून तिला ‘पुष्करिणी एक्सप्रेस’ म्हणून उन्नत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विशेष धार्मिक यात्रांसाठी आरक्षित डबे किंवा विशेष गाड्या चालविण्याचीही मागणी करण्यात आली.

खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या या समन्वित व दूरदृष्टीपूर्ण प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा, तीर्थक्षेत्र–पर्यटन, औद्योगिक वाहतूक आणि प्रवासी सुविधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास मराठवाडा रेल्वे नकाशावर एक सशक्त व महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande