
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर वसलेले तळेगाव ठाकूर गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळील भागात लावण्यात आलेले विविध फलक अचानक गायब झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दिनांक १८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागरिकांना फाट्याजवळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, श्री राधास्वामी सत्संग केंद्र तसेच काही राजकीय पक्षांचे लावलेले फलक जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले.हे फलक नेमके कोणी आणि कशासाठी काढले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परिणामी गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेष म्हणजे, तळेगाव ठाकूरकडे जाण्यासाठी आजतागायत ठोस दिशादर्शक फलकच नसल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फाट्यावरील फलक काढण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा त्वरित शोध घेऊन तळेगाव ठाकूरकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी दिशादर्शक फलक व प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काळात ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात तळेगाव-ठाकूरचे ग्रामस्थ मारुती निमकर म्हणाले की, तिवसा तालुक्यातील अनेक गावांच्या मुख्य प्रवेश मार्गावर आकर्षक प्रवेशद्वार (कमानी) उभारण्यात आल्या असताना तळेगाव ठाकूर या गावाला अद्यापही अशी कोणतीही कमान नसणे, ही बाब नाराजीचे कारण ठरत आहे. इतर गावांना ओळख देणाऱ्या सुविधा मिळतात, मात्र आमच्या गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी