अमरावतीत निवडणूकीसाठी ‘एक खिडकी कक्षा’ची स्थापना
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) सार्वत्रिक निवडणूका २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मतदान व निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी कक्षा’ची स
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात निवडणूकीसाठी ‘एक खिडकी कक्षा’ची स्थापना सार्वत्रिक निवडणूका २०२५ साठी परवानग्या आता एका ठिकाणी


अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) सार्वत्रिक निवडणूका २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मतदान व निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामुळे उमेदवार, राजकीय पक्ष तसेच संबंधित यंत्रणांना निवडणूकीसंदर्भातील विविध परवानग्या मिळवणे अधिक सोपे व वेळेची बचत करणारे ठरणार आहे. सदर एक खिडकी कक्षाचे नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. सागर रा. वानखडे, सहायक संचालक नगररचना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत असून, निवडणूक काळात येणाऱ्या विविध अर्ज व परवानग्यांवर तात्काळ व नियमबद्ध कार्यवाही केली जाणार आहे. या एक खिडकी कक्षामार्फत उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यात येणार आहेत. प्रचार सभा, चौक सभा, बैठक सर्व प्रकारच्या जाहीर सभांसाठी परवानगी, प्रचारासाठी पोस्टर व झेंडे सभा स्थळावर तसेच इतर ठिकाणी लावण्याची परवानगी, खाजगी जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी यांचा समावेश आहे. तसेच उमेदवाराच्या कार्यक्षेत्रापुरते प्रचार वाहन वापरण्याची परवानगी, प्रचार कार्यालय सुरू करण्याची परवानगीही या कक्षामार्फत देण्यात येणार आहे. याशिवाय, हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी, ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी, मिरवणूक, रोडशो व रॅली काढण्यासाठी परवानगी, केबल जाहिरात तसेच व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्सच्या प्रसिद्धीसाठी परवानगी देण्याचे कामकाजही या एक खिडकी कक्षामार्फत केले जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित इतर सर्व तदनुषंगिक कामकाजही या कक्षातून पार पडणार आहे. एक खिडकी कक्ष अमरावती महानगरपालिका, राजकमल चौक येथील मुख्य इमारतीमध्ये सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय, दुसरा माळा येथील इंजिनियर्स केबिनमध्ये स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक काळात उमेदवार व संबंधितांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात, प्रशासनावरचा ताण कमी व्हावा तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक राहावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक नगररचना, अमरावती महानगरपालिका यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande