नांदगाव पेठमध्ये शंकरपटाची जय्यत तयारी
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामदैवत संत श्री काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नांदगाव पेठ येथे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यु
नांदगाव पेठमध्ये शंकरपटाची जय्यत तयारी21 डिसेंबर रोजी होणार भव्य उद्घाटन


अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामदैवत संत श्री काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नांदगाव पेठ येथे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा शेतकरी मित्र परिवार व स्व. सौ. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 21 व 22 डिसेंबर रोजी हा शंकरपट पार पडणार आहे. शंकरपटाच्या यशस्वी आयोजनासाठी सध्या पुसदकर कला महाविद्यालयासमोरील विशाल मैदानात जय्यत तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

शंकरपटप्रेमी प्रेक्षकांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, धुरकर्‍यांसाठी सुसज्ज मैदान, अपघातप्रसंगी तत्काळ वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षेसाठी प्रशिक्षित रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.धार्मिकता, परंपरा आणि कृषिसंस्कृतीचा सुंदर संगम घडवणारा हा शंकरपट नांदगाव पेठच्या सांस्कृतिक वारशाला नवे बळ देणारा ठरणार आहे. लाखो रुपयांच्या आकर्षक बक्षिसांची लयलूट हे या शंकरपटाचे विशेष आकर्षण असून, त्यामुळे जिल्हाभरातील बैलगाडी मालक, शेतकरी वर्ग आणि रसिक प्रेक्षक या स्पर्धेकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा होत असलेल्या या भव्य शंकरपटामुळे नांदगाव पेठसह परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धकांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था, प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आसनव्यवस्था, सुव्यवस्थित नियंत्रण व सुरक्षिततेची जबाबदारी आयोजन समितीने काटेकोरपणे हाती घेतली आहे.संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने होत असलेला हा ऐतिहासिक शंकरपट नांदगाव पेठच्या कृषी व सांस्कृतिक परंपरेला नवचैतन्य देणारा ठरणार असून, या उपक्रमात धुरकर्‍यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे रुपेश इंगळे, भूषण तुळे, अक्षय डाखोडे, अंकुश बोबडे, अतुल हटवार, वैभव धर्मे, श्याम तायडे, चरणभाऊ खराटे, ज्ञानेश्‍वर ढेंगे व भास्कर राजुरकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande