
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) | आयुक्तांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर माता व नवजात बालकांची नोंद प्रत्यक्ष रियल टाईम रिपोर्टिंग स्वरूपात युविन पोर्टलवर करण्यावर भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रात नोंद असलेल्या आणि जिथे प्रसूती होतात अशा १०० खाजगी रुग्णालयांसाठी युविन पोर्टलचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये युविन पोर्टल म्हणजे काय, त्यावर गरोदर माता व बालकांची नोंद कशी करावी, तसेच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या पोर्टलचा कसा उपयोग होतो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. लसीकरण कार्यक्रमांतर्गत एकही माता अथवा बालक नोंदीविना राहू नये व त्यांना वेळेत लस मिळावी, यासाठी युविन पोर्टलवर नोंद होणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी खाजगी रुग्णालयांना आवाहन केले की, सेवेसाठी येणाऱ्या सर्व गरोदर माता व जन्म झालेल्या बालकांची पोर्टलवर नोंद करावी, तसेच दिलेल्या जन्मतत्काळ लसीकरणाची माहितीही नोंदवावी, जेणेकरून एकही माता अथवा बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
हे प्रशिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे पार पडले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, माता व बाल संगोपन अधिकारी स्वाती कोवे, यूएनडीपीच्या प्रोजेक्ट ऑफिसर अश्विनी नागर, युविन समन्वयक अमोल बोरकर, दायला तसेच महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी व खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी