
अमरावती, 20 डिसेंबर (हिं.स.) | जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ तर २८ नगरसेवक पदांसाठी १७३ उमेदवार रिंगणात असून सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. शहरातील एकूण ५२ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक 4/3 येथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले.
निवडणुकीत काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शांततापूर्ण मतदानासाठी संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी