
रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जडणघडणीसाठी “कायदा आणि करिअर” या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
या सेमिनारसाठी कामगार न्यायालय, रायगड–अलिबाग येथील सन्माननीय न्यायाधीश जी. एस. हांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शनपर व्याख्यानात न्यायाधीश हांगे यांनी वकिली क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि सातत्याचे महत्त्व स्पष्ट केले. समाजाचा वकिली व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून, विशेषतः महिला वकिलांना आजही विविध अडचणींना सामोरे जावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वकिली व्यवसायातील तीन टप्प्यांबाबत मार्गदर्शन करताना, सुरुवातीच्या टप्प्यात येणारी निराशा बाजूला ठेवून स्वतःच्या कौशल्याच्या बळावर स्वतंत्रपणे वकिली करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कायद्याची निर्मिती इंग्रजी भाषेत झाल्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे प्रभुत्व मिळवावे, त्यासाठी अवांतर वाचनाची सवय लावावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच विधी शिक्षण घेताना वक्तृत्व, वादविवाद, मूट कोर्ट, संशोधन, निरीक्षणशक्ती यांसारखी कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वकिली व्यवसायात शिस्त, कौशल्य, निश्चय, इच्छाशक्ती आणि निष्ठा हे गुण अनिवार्य असल्याचे सांगताना त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ नानी पालखीवाला यांच्या कारकिर्दीचा उदाहरणादाखल उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी चांगले वकील होण्याबरोबरच चांगले नागरिक व व्यक्ती घडविण्यासाठी सत्य व सद्गुणांचा ध्यास घ्यावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या सेमिनाराच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले. आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी आभार मानले. करिअर मार्गदर्शन समितीमार्फत प्रा. सुरज पुरी, प्रा. पियुषा पाटील, प्रा. चिन्मय राणे व प्रा. कौशिक बोडस यांनी आयोजन केले. सेमिनारसाठी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके