‘लोक सोबत आहेत’ हा राष्ट्रवादी आ. अनिल पाटील यांचा समज अमळनेरकरांनी फोल ठरवला
जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णतः उलथून टाकणारा निकाल समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल पाटील यांना हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-राष्ट्रवादी आघाड
‘लोक सोबत आहेत’ हा राष्ट्रवादी आ. अनिल पाटील यांचा समज अमळनेरकरांनी फोल ठरवला


जळगाव, 22 डिसेंबर (हिं.स.) | नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णतः उलथून टाकणारा निकाल समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल पाटील यांना हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-राष्ट्रवादी आघाडीचा विजय निश्चित असल्याचे चित्र रंगवले जात होते. मात्र अमळनेरकरांनी या सर्व दाव्यांना साफ नकार देत शिवसेना (शिंदे गट)च्या पारड्यात स्पष्ट कौल दिला आहे.

नगराध्यक्षपदावर शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी झाले आहे. नगरपालिका निवडणूक असली तरी या लढतीला विधानसभेच्या मिनी निवडणुकीसारखे स्वरूप आले होते. आमदार अनिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराची धुरा स्वतः हाती घेतली होती. खासदार स्मिता वाघ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी अमळनेरमध्ये ठाण मांडले. रॅली, बैठका, घराघरांत संपर्क अशा सर्व प्रचार यंत्रणा राबवण्यात आल्या. ‘आघाडीचा विजय निश्चित’ अशी भाषा सातत्याने वापरली जात होती.

मात्र मतदारांनी या प्रचाराच्या गदारोळाऐवजी शांतपणे आपल्या अपेक्षा आणि शहराच्या भविष्यासाठी मतदानाचा निर्णय घेतल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या विजयाने अमळनेरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. उच्च शिक्षित, अभ्यासू आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून त्यांची ओळख होती. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली होती. प्रचारात आक्रमक राजकारणाऐवजी त्यांनी विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले.

‘नगरपालिका ही विकासाची प्रयोगशाळा आहे’ हा त्यांचा संदेश अमळनेरकरांच्या मनाला भिडल्याचे मतदारांच्या निर्णयातून दिसून आले. या निकालाने भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपद गमावणे म्हणजे केवळ सत्ता हातातून जाणे नाही, तर स्थानिक पातळीवरील विश्वासालाच तडा जाणे होय. विशेषत: आमदार अनिल पाटील यांच्यासाठी हा निकाल चिंताजनक मानला जात आहे. त्यांच्या मतदारसंघातच आघाडीला पराभव स्वीकारावा लागल्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा इशारा समजला जात आहे. ‘लोक आपल्या सोबत आहेत’ हा समज अमळनेरकरांनी चुकीचा ठरवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande