नाशिकमध्ये साकारणार भव्य राम देवराई, सिंहस्थात हरित कुंभसाठी किर्लोस्कर वसुंधराचा पुढाकार
नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)। : आगामी सिंहस्थ कुंभमेळा–२०२७ दरम्यान हरित कुंभ साकारण्यासाठी किर्लोस्कर वसुंधराने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडिया जनजागृती, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या विविध मोहिमा राबविण्
नाशिकमध्ये साकारणार भव्य राम देवराई, सिंहस्थात हरित कुंभसाठी किर्लोस्कर वसुंधराचा पुढाकार


नाशिक, 22 डिसेंबर (हिं.स.)।

: आगामी सिंहस्थ कुंभमेळा–२०२७ दरम्यान हरित कुंभ साकारण्यासाठी किर्लोस्कर वसुंधराने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडिया जनजागृती, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या विविध मोहिमा राबविण्यात येणार आहे. नाशिक मध्ये भव्य राम देवराई उभारणार असून, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जागा ही शासनाकडून मिळणार असून, सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतर काम हाती घेण्यात येणार असल्याचे किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात राबविण्यात येणाऱ्या हरित कुंभ संकल्पनेचे सादरीकरण करण्यासाठी किर्लोस्कर वसुंधरातर्फे १४ सप्टेंबर २०२५ रोजी हॉटेल एक्सप्रेस इन येथे कुंभ परिषद आयोजित करण्यात आली होती. सिंहस्थ प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंग यांच्या समवेत किर्लोस्कर वसुंधराची बैठक घेण्यात आली. या उपक्रमांची माहिती देण्यासाठी हॉटेल बीएलव्हीडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ग्लोबल पॉवर अ‍ॅण्ड एनर्जीचे सीएचआरओ अमरजीत सिंग, साईट लीडर व्ही. पी. रमेश चव्हाण, शोकेस फिल्म सोसायटीचे अध्यक्ष हेमंत बेळे आदी उपस्थित होते.

चित्राव म्हणाले की, किर्लोस्कर वसुंधरेतर्फे राबविण्यात येणारी हरित कुंभ संकल्पना नाशिककरांसह संपूर्ण देशवासीयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी सोशल मीडिया, मॉक ड्रिल, पथनाट्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. या उपक्रमांमध्ये छोटे दुकानदार व व्यावसायिक यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. नदी व धरणांवरील पाण्याचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भूजल पुनर्भरण व जलसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नो प्लास्टिक मोहीम राबविण्यात येणार असून भाविकांसाठी सुमारे एक कोटी कापडी पिशव्या वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी महिला बचत गटांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय माय होम ग्रीन होम, माय ऑफिस ग्रीन ऑफिस, हेरिटेज वॉक, घाटांवर संवाद, माहितीफलकांची उभारणी तसेच निर्माल्यापासून उपयुक्त वस्तू निर्मिती अशा विविध पर्यावरणपूरक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ किर्लोस्कर वसुंधरा पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या चळवळीत कार्यरत आहे. विशेषतः वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून केलेले कार्य उल्लेखनीय राहिले आहे. त्याद्वारे अनेक कॉलेजेस, शाळा आणि पर्यावरणात काम करणाऱ्या संस्थांशी किर्लोस्कर वसुंधरा जोडले गेले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande