
अपघातानंतरही संजय खोडकेंचे व्हिसीव्दारे कार्यकर्त्यांना संबोधन
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.)|अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जोरदार तयारीला सुरुवात करत परिवार मेळाव्यातून रणशिंग फुंकले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात पार पडलेल्या या मेळाव्यात आमदार सुलभा संजय खोडके यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध समाजघटकांना संबोधित करत “ही निवडणूक केवळ लढायची नसून जिंकायची आहे” असा स्पष्ट संदेश दिला.
राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असून सर्वसमाज घटकांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत अमरावती शहरात झालेली विकासकामे, पायाभूत सुविधा, महिला, युवक, आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्यायाच्या योजना या जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात अमरावतीच्या शाश्वत विकासासाठी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात विविध समाजांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिपक उर्फ गजानन लोखंडे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमात महिलांपासून युवकांपर्यंत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, त्यामुळे संपूर्ण मेळाव्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
अपघातानंतरही संजय खोडकेंचे व्हिसीव्दारे कार्यकर्त्यांना संबोधन
शनिवारी आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला अपघात होता. ते जखमी अवस्थेत रीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे ते मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होऊ नये म्हणून त्यांनी हॉस्पिटलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. अमरावती विभाग अन्य विभागांच्या तुलनेत मागासलेला असून उद्योग, शिक्षण आणि बॅकलॉग भरून काढण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी