
नांदेड, 22 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड वाघाळा महानगरपालिकेला शिवसेनेचा पहिला महापौर दिला होता. त्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभहोणार असून, उद्या दि.२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. या महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची स्थापना १९९६ रोजी झाली व या महापालिकेची पहिली निवडणूक १९९७साली झाली. यावेळी या महापालिकेत ३ लाख १४ हजार ३१० मतदार होते. तर ६५ वार्ड या महापालिकेत होते. पहिले महापौर म्हणून शिवसेनेने या महापालिकेवर इतिहास घडवून सुधाकर पांढरे यांच्या रुपाने पहिला महापौर दिला. त्यानंतर २००२ रोजी प्रभागनिहाय निवडणूका घेण्याचे ठरले त्यावेळी २४ प्रभाग व ७३ नगरसेवक निवडून आले. २००७ साली पुन्हा वार्डनिहाय मतदान झाले व ७९ नगरसेवक त्यावेळी निवडून आले. २०१२ मध्ये ४० प्रभाग होते व ८१ उमेदवार निवडून आले
यावेळी २० प्रभाग व ८१ नगरसेवक निवडून द्यायचे असून, एक प्रभाग चार उमेदवारांचा असे १९ प्रभाग असून, एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे. यात अनुसूचित जातीच्या १५, अनुसूचित महिलांच्या ८, अनुसूचित जमातीच्या २, अनुसूचित जमाती महिलांच्या १, नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधून २१ तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमधून ११ तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून ४३ व त्यातील महिलांमधून २१ असे ८१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यावेळी मतदारांची संख्या पाच लक्ष १७ हजार ९९९ एवढी असून, त्यातील पुरुष मतदारांची संख्या २ लाख ५४ हजार ९९९ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ४६ हजार ६९६ एवढी आहे. तर १०४ मतदार हे तृतीयपंथी असणार आहेत. या निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार २३ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते ३ तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २५ डिसेंबरला ख्रिसमसची तर २८ डिसेंबरला रविवारची सुट्टी असल्याने यावेळी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होवून २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल व १५ जानेवारी रोजी मतदान होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis