
लातूर, 22 डिसेंबर (हिं.स.)। उघड्यावर लघुशंका व शौच ही अजूनही समाजासमोरील मोठी समस्या असून, यामुळे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. याच समस्येविरोधात प्रभावी आणि वेगळ्या पद्धतीने जनजागृती करण्यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने थ्री इडियट्स चित्रपटातील प्रसिद्ध दृश्याची प्रतिकृती साकारत शहरात एक हटके उपक्रम राबवला आहे. लातूर शहरातील मुख्य चौकात हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना 'करंट' लागेल, अशा आशयाचा फलक व प्रतिकात्मक रचना उभारण्यात आली होती. चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या या संकल्पनेमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि परिसरात एकच कुतूहल निर्माण झाले. अनेक नागरिक थांबून या उपक्रमाबाबत माहिती घेत होते, तर काहींनी मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर शेअर केले.
वसुंधरा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व जनजागृतीच्या विविध उपक्रमांत सक्रिय आहे.
फलक याच मालिकेतून उघड्यावर लघुशंका रोखण्यासाठी हा अभिनव प्रयोग करण्यात आला. केवळ सूचना लावण्याऐवजी, थेट लोकांच्या मनावर ठसा उमटेल अशा पद्धतीने संदेश देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्यकारी अध्यक्ष अमोलआप्पा स्वामी, मुख्य समन्वयक राहुल माशाळकर, जिल्हाध्यक्ष उमेश आप्पा ब्याकोडे, वृक्ष लागवड अभियान उप-प्रमुख संजय माकुडे यांनी सहभागी होत जनजागृती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis