
लातूर, 22 डिसेंबर (हिं.स.)। विद्वत्ता आणिनैतिक मूल्यांचे प्रतीक म्हणून ओळख असलेले माजी केंद्रिय गृहमंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे १२ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लातूरकरांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली आहे. ही श्रद्धांजली सभा मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता दयानंद सभागृह येथे होणार आहे. लातूरचे नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार, केंद्रिय मंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यपाल अशी विविध पदे भूषवत असताना शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकारणात कायम नैतिकता जपली. मूल्यांना महत्त्व दिले. सुसंस्कृत राजकारणाचा, निष्कलंक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घालून दिला. आपल्या प्रदीर्घ
राजकीय, सामाजिक कारकिर्दीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी (ता. २३) दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेस नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अष्टविनायक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप राठी, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, अॅड. धनंजय पाटील, इसाक नवाब पटेल, दगडे, राजेश्वर बुके आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis