मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून ठाकरे गटाचा भाजपवर आरोप
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी भाजपवर गंभीर आणि सनसनाटी आरोप केला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना
Thackeray  accuses BJP BMC


मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी भाजपवर गंभीर आणि सनसनाटी आरोप केला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवण्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. अखिलेश चित्रे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपल्या पोस्टमध्ये चित्रे यांनी म्हटले आहे की, भाजपने आजवर मुंबईत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल अशी आडनावे असलेले अमराठी उपमहापौर दिले आहेत. त्यामुळे सध्या जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना “मुंबईचा महापौर मराठी असेल का?” असा प्रश्न विचारतात, तेव्हा थेट उत्तर देण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “महापौर महायुतीचाच होणार” असे सांगतात, तर आशिष शेलार “महापौर हिंदू होणार” असे म्हणतात. मात्र, कुणीही ठामपणे “महापौर मराठीच होणार” असे सांगत नाही, याकडे चित्रे यांनी लक्ष वेधले आहे.

याचाच अर्थ भाजपने आधीच मुंबईच्या महापौरपदासाठी अमराठी उमेदवार निश्चित केला असून तो मोहित कंबोज असल्याचा आरोप अखिलेश चित्रे यांनी केला आहे. मराठी माणसाने आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचे का, असा थेट सवाल करत त्यांनी स्वाभिमानी मराठी जनतेने याला विरोध करावा, असे आवाहन केले आहे. धनाढ्य असल्यामुळे महायुतीकडून हुजरी केली जात असेल, पण मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

या दाव्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीकडून एकत्र लढवली जाण्याची शक्यता असून भाजप आणि शिंदे गटामध्ये मुख्यत्वे जागावाटप होणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकद नसल्याने भाजप आणि शिंदे गटाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८२ तर एकत्रित शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी उद्धव ठाकरे यांचे मन राखण्यासाठी भाजपने महापौरपदासाठी आक्रमक भूमिका घेतली नव्हती. मात्र, यंदा परिस्थिती भाजपसाठी अधिक अनुकूल असल्याचे मानले जात असून कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपलाच महापौर बसवण्याचा चंग भाजपने बांधल्याची चर्चा आहे. असे असले तरी महापौरपदाचा उमेदवार कोण असेल, हे भाजपने अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande