
चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)चंद्रपूर जिल्ह्याची कीर्ती वाढवणारे एक आदर्श आरोग्य केंद्र म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलकडे पाहिले जाईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. चंद्रपूर येथे सुमारे २८० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या १४४ खाटांच्या भव्य व अत्याधुनिक पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या हॉस्पिटलमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
चंद्रपूर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याला चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनचे संचालक डॉ. कैलास शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, डॉ. अजय चंदनवाने यांची उपस्थिती होती.
आरोग्य आणि शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजा असून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकेंद्रित, सुलभ व परवडणारी सेवा असावी, असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले. कॅन्सरसारख्या आजारामुळे रुग्ण तर मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचतोच, शिवाय रुग्णाच्या कुटुंबालाही मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे रुग्णावरील उपचारांसोबतच त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. तपासणी व उपचारासाठी वारंवार प्रवास करावा लागतो. मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि निवासाच्या अडचणीही येतात. ते लक्षात घेता उपकेंद्रांच्या माध्यमातून रुग्णांच्या जवळ सेवा नेण्याचा विचार हा प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या केंद्राच्या यशस्वी कार्यासाठी समाजाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कॅन्सर रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना आधार देणे ही केवळ हॉस्पिटलची जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी सेवाभाव, संवेदनशीलता आणि सहकार्याच्या माध्यमातून हे केंद्र आदर्श ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी नागपूर किंवा मुंबईसारख्या लांबच्या शहरांवर अवलंबून राहावे लागू नये, हा या हॉस्पिटलमागचा मूलभूत हेतू असल्याचेही पूजनीय सरसंघचालकांनी नमूद केले. चंद्रपूरमध्येच उच्च दर्जाची तपासणी, उपचार आता उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर करुणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचा संगम घडून येईल आणि तेच या हॉस्पिटलचे खरे सामर्थ्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण हा चंद्रपूर व विदर्भातील जनतेसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याची भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. २०१६ पासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे प्रत्यक्ष साकार रूप असून, सुमारे २८० कोटी रुपये खर्चून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आशेचा मजबूत आधार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते हे रुग्णालय जनतेस अर्पण होताना पाहणे हा अत्यंत समाधानकारक व प्रेरणादायी क्षण असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
१४० खाटांचे हे भव्य कॅन्सर रुग्णालय केवळ उपचारांचे केंद्र नसून, रुग्णांना सुलभ, सन्मानपूर्वक व विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळावी या भावनेतून साकारलेले आशास्थान आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना आता कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी दूरच्या शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. या हॉस्पिटलमुळे हजारो कुटुंबांना दिलासा, आत्मविश्वास आणि नवसंजीवनी मिळेल, असा ठाम विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ही आहेत रुग्णालयाची वैशिष्ट्ये-
तळमजला + ४ मजले : १,००,०००+ चौ. फूट बांधकाम,१४० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र,Linear Accelerators (२), ब्रेकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे,केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव