
जळगाव, 24 डिसेंबर (हिं.स.) क्रेडीट कार्ड बंद करून नवीन कार्ड काढून देतो, असा बहाणा करीत आवश्यक कागदपत्रे मिळवून सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना गणेश कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कपिल पाटील नामक व्यक्तीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन वेरांग्या पावरा (रा. दादावाडी) हे शहरातील गणेश कॉलनी भागातील ‘दुसरे विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (साखर)’ कार्यालयात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कामावर असताना कपिल पाटील नावाचा व्यक्ती त्यांच्याकडे आला. त्याने जुने क्रेडीट कार्ड बंद करून नवीन कार्ड तयार करून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करत त्याने पावरा यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्डची प्रत घेतली. यानंतर पावरा यांच्या नावाने नवीन क्रेडीट कार्ड काढण्यात आले; मात्र त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करून संबंधित व्यक्तीने कार्डवर पूर्ण नियंत्रण मिळवले. पुढील काही दिवसांत वेळोवेळी या कार्डवरून एकूण ४९ हजार ३८ रुपये काढून घेतल्याचे पावरा यांच्या निदर्शनास आले. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कपिल पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर