
जळगाव , 24 डिसेंबर (हिं.स.) | जळगाव महानगरपालिका निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर काम करीत असून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे. निवडणूक काळात सुमारे ७० ते ८० गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना केवळ मतदानासाठी दोन ते तीन तासांची मर्यादित सवलत देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात रणधुमाळीला सुरुवात झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने अॅक्शन मोडवर काम सुरू केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार संशयित व उपद्रवी घटकांवर कारवाई, ठिकठिकाणी नाकाबंदी, तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मतदानाच्या ८ ते १५ दिवस आधीपासून उपद्रवींना शहराबाहेर पाठविण्याची प्रक्रिया राबविली जाणार असून, हद्दपार करण्यात येणाऱ्या व्यक्तींना फक्त मतदानासाठी त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर काही तास उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासोबतच अनेक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून काहींकडून बाँड भरून घेण्यात येणार आहेत, तर काहींना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग अथवा अन्य गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे.
आवश्यक असल्यास अशा व्यक्तींना नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एसआरपी व आरसीपीच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर