
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। गुगलने भारतात प्रथमच अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस (ELS) सुरू केली असून या सेवेची सुरुवात उत्तर प्रदेश राज्यातून झाली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस केल्यास कॉल करणाऱ्या व्यक्तीचे अचूक स्थान आपोआप आपत्कालीन सेवांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अपघात, गुन्हेगारी घटना किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
अँड्रॉइड इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ही अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्येच समाविष्ट असलेली सुविधा आहे. आपत्कालीन कॉल किंवा एसएमएसच्या वेळी ही सेवा फोनमधील जीपीएस, वाय-फाय आणि मोबाईल नेटवर्क सिग्नल्सचा वापर करून कॉलरचे स्थान निश्चित करते आणि ते थेट आपत्कालीन सेवांना पाठवते. गुगलच्या माहितीनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये ही सेवा सुमारे 50 मीटरच्या आत अचूक स्थान प्रदान करते. यासोबतच फोनची भाषा सेटिंग्ससारखी अतिरिक्त माहितीही पाठवली जाऊ शकते, ज्यामुळे आपत्कालीन केंद्रातील ऑपरेटरांना कॉल करणाऱ्याशी संवाद साधणे अधिक सोपे होते.
ही सेवा जगातील 60 हून अधिक देशांमध्ये आधीपासूनच कार्यरत असून आता भारतात उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 सेवेशी एकत्रित करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून अँड्रॉइड 6.0 किंवा त्यापेक्षा उच्च आवृत्ती असलेल्या स्मार्टफोनवर कोणत्याही अतिरिक्त अॅप किंवा हार्डवेअरशिवाय कार्य करते.
उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे जिथे ELS पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. उत्तर प्रदेश पोलिस आणि पर्ट टेलिकॉम सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली. गेल्या काही महिन्यांत झालेल्या पायलट चाचण्यांदरम्यान या सेवेने 20 दशलक्षांहून अधिक आपत्कालीन कॉल आणि एसएमएसना यशस्वीरीत्या सपोर्ट दिला आहे. विशेष म्हणजे, कॉल काही सेकंदांतच डिस्कनेक्ट झाला तरीही कॉलरचे स्थान ओळखण्यात ही प्रणाली सक्षम ठरली आहे.
ही सेवा मशीन लर्निंगवर आधारित अँड्रॉइडच्या फ्युज्ड लोकेशन प्रोव्हायडरद्वारे कार्य करते. त्यामुळे शहरी भाग, ग्रामीण परिसर, महामार्ग किंवा दूरस्थ भागातसुद्धा अचूक स्थान उपलब्ध होऊ शकते. 112 वर कॉल केल्यानंतर कॉलरचे स्थान थेट यूपी112 कमांड सेंटरमध्ये दिसते, ज्यामुळे पोलिस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची मदत तात्काळ पाठवता येते.
गोपनीयतेच्या दृष्टीनेही गुगलने स्पष्ट भूमिका मांडली आहे. इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ही फक्त आपत्कालीन कॉल किंवा एसएमएसच्या वेळीच सक्रिय होते आणि पार्श्वभूमीत सतत कार्यरत राहत नाही. स्थानाची माहिती थेट फोनमधून आपत्कालीन सेवांना पाठवली जाते आणि गुगल ती माहिती संग्रहित किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापरत नाही. उत्तर प्रदेशानंतर देशातील इतर राज्यांनीही हे तंत्रज्ञान स्वीकारावे, जेणेकरून संपूर्ण भारतात आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असे आवाहन गुगलने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule