
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने डिजिटल मर्चंट कॅश अॅडव्हान्स कर्जांची घोषणा केली आहे. ही उद्योगक्षेत्रातील पहिली, रोख प्रवाहावर आधारित वित्तपुरवठा उपायसुविधा असून भारतभरातील सूक्ष्म आणि लघु व्यवसायांसाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे. हे नाविन्यपूर्ण, पूर्णपणे डिजिटल उत्पादन 2 लाख रु. ते 20 लाख रु. पर्यंतचे विनातारण कर्ज उपलब्ध करून देते. त्यायोगे व्यापाऱ्यांना, विशेषतः रिटेल दुकानदारांना जलद पतपुरवठा मिळवता येतो तसेच त्यांच्या व्यवसायाच्या रोख प्रवाहाशी सुसंगत दैनंदिन हप्त्यांद्वारे परतफेड करता येते.
ही उपायसुविधा पूर्णतः डिजिटल असून, पारंपरिक आर्थिक विवरणपत्रांऐवजी रोख प्रवाह माहिती आणि इतर निकषांच्या आधारे पात्रतेचे मूल्यमापन केले जाते. कर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ग्राहकांना अॅक्सिस बँकेची चालू खाते सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ऑनबोर्डिंगपासून निधी वितरणापर्यंत अखंड एंड-टू-एंड अनुभव सुनिश्चित होतो. अर्जदारांना काही मिनिटांतच त्वरित पत निर्णय मिळतो आणि काही दिवसांत निधी वितरित केला जातो. परतफेड दैनंदिन हप्त्यांद्वारे आपोआप होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या ईएमआयऐवजी प्रत्यक्ष विक्रीच्या आधारे परतफेड करता येते. हे एव्हरीडे इन्स्टॉलमेंट (EDI) मॉडेल परतफेडीत लवचिकता प्रदान करते आणि खेळते भांडवल स्थिर राखण्यास मदत करते.
या सादरीकरणावर भाष्य करताना अॅक्सिस बँकेच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपचे प्रेसिडेंट आणि हेड विजय शेट्टी म्हणाले, “डिजिटल मर्चंट कॅश अॅडव्हान्स कर्जे त्वरित पत सुविधा आणि चालू खाती यांना एकत्र आणून एक अखंड, डिजिटल उपायसुविधा देतात. व्यापाऱ्यांच्या व्यवसायाच्या गरजांशी सुसंगत लवचिक दैनंदिन परतफेडीद्वारे याला आधार मिळत आहे. रोख प्रवाहावर आधारित हमीचा लाभ घेऊन एमएसएमईंसाठी वेळेवर निधी अधिक सुलभ करण्याचा आमचा उद्देश आहे. हे सादरीकरण आमच्या डेटा-आधारित कर्जपुरवठ्याला पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून भारतातील एमएसएमईंना सोपी, जलद आणि विश्वासार्ह पत उपलब्ध करून देण्याच्या आमच्या बांधिलकीला बळकटी देत आहे.”
या सादरीकरणासह पत उपलब्धतेचा विस्तार करत आणि मर्यादित किंवा कोणतेही तारण अथवा आर्थिक विवरणपत्रे नसल्यामुळे पारंपरिक औपचारिक पत मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागलेल्या व्यवसायांसाठी जलद निधी उपलब्ध करून देत अॅक्सिस बँक एमएसएमई क्षेत्रावर आपला भर अधिक मजबूत करत आहे. मर्चंट कॅश अॅडव्हान्स लाभ घेऊ इच्छिणारे एमएसएमई त्यांच्या जवळच्या अॅक्सिस बँक शाखेत अर्ज करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट देऊ शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule