
लातूर, 24 डिसेंबर (हिं.स.)।
लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी लातूर शहर पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, अवघ्या एका दिवसात लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे:
बुलेट सायलेन्स (इंदौरी फटका): मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर्स वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करून सायलेन्सर्स जप्त केले जात आहेत.
ट्रिपल सीट दुचाकी: दुचाकीवर तीन व्यक्ती प्रवास करणाऱ्यांवर ई-चलन द्वारे दंड आकारला जात आहे.
बेशिस्त रिक्षाचालक, फ्रंट सीटवर प्रवासी बसवणे, गणवेश परिधान न करणे आणि भरचौकात रिक्षा थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
चालू वाहनावर मोबाईल वापर: वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर सीसीटीव्ही आणि प्रत्यक्ष कारवाई केली जात आहे.
रिक्षा व इतर वाहने: २२६ रिक्षा व इतर वाहनांवर केसेस करण्यात आल्या असून १,९५,९००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे.
इंटरसेप्टर वाहनाद्वारे ६० केसेस करण्यात आल्या असून १,२०,०००/- रुपये दंड करण्यात आला आहे.
मुख्य चौकामध्ये ५० ते ७५ मीटर अंतराच्या आत अवैधपणे वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम-२८५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी स्पष्ट केले आहे की, ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाणार असून ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis