
अंकारा, 24 डिसेंबर (हिं.स.)।तुर्कीमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल-हमीद दबिबा यांनी तुर्कीमध्ये झालेल्या या विमान दुर्घटनेत देशाचे सैन्यप्रमुख (मिलिटरी चीफ) मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी घडला, जेव्हा लिबियाचे शिष्टमंडळ तुर्कीची राजधानी अंकारा येथे अधिकृत दौरा पूर्ण करून मायदेशी परतत होते.
पंतप्रधान दबिबा यांनी जारी केलेल्या निवेदनात या घटनेला अपघाती आणि अत्यंत दुर्दैवी ठरवत, ही लिबियासाठी मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. लिबियाचे सैन्यप्रमुख, चार अन्य वरिष्ठ अधिकारी आणि तीन विमानचालक दलाचे सदस्य यांना घेऊन जाणारे एक खासगी विमान अंकाराहून उड्डाण घेतल्यानंतर कोसळले, ज्यामध्ये विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. लिबियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघाताचे कारण विमानातील तांत्रिक बिघाड होते.
लिबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की उड्डाणानंतर सुमारे 30 मिनिटांनी विमानाशी संपर्क पूर्णपणे तुटला. प्राथमिक माहितीनुसार, हा संपर्क तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय संरक्षण चर्चेसाठी लिबियन शिष्टमंडळ अंकारामध्ये उपस्थित होते.
यापूर्वी तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले होते की लिबियाचे सैन्यप्रमुख आणि चार अन्य व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या ‘फाल्कन-50’ श्रेणीतील खासगी जेटचे अवशेष अंकाराजवळ सापडले आहेत. त्यानंतर लिबियाच्या पंतप्रधानांनी सर्व प्रवाशांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले इतर चार अधिकारी म्हणजे लिबियाच्या भूदलांचे प्रमुख जनरल अल-फितौरी गरैबिल, लष्करी उत्पादन प्राधिकरणाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल महमूद अल-कतावी, चीफ ऑफ स्टाफचे सल्लागार मोहम्मद अल-असावी दियाब आणि चीफ ऑफ स्टाफ कार्यालयातील लष्करी छायाचित्रकार मोहम्मद उमर अहमद महजूब होते. तीनही विमानचालक दलाच्या सदस्यांची ओळख तत्काळ समजू शकलेली नाही.
तुर्कीच्या गृहमंत्र्यांच्या माहितीनुसार, विमानाने मंगळवारी सायंकाळी सुमारे 8:30 वाजता अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून उड्डाण घेतले होते. सुमारे 40 मिनिटांनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाशी संपर्क तुटला. त्यापूर्वी विमानाने अंकाराच्या दक्षिणेस असलेल्या हायमाना जिल्ह्याजवळ आपत्कालीन लँडिंगचा सिग्नल पाठवला होता. स्थानिक दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेरा फुटेजमध्ये हायमाना परिसराच्या आकाशात अचानक तीव्र प्रकाश दिसून आला, ज्याकडे संभाव्य स्फोट म्हणून पाहिले जात आहे.
मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद हे तुर्कीच्या अधिकृत दौऱ्यावर अंकारा येथे आले होते, जिथे त्यांनी तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अल-हद्दाद हे पश्चिम लिबियातील सर्वोच्च लष्करी कमांडर होते आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या लिबियातील विभागलेल्या सैन्याला एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
या अपघाताची माहिती मिळताच अंकारा विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आणि अनेक उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली. सध्या या दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना लिबियाच्या सुरक्षा आणि राजकीय दृष्टीने मोठा धक्का मानली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode