
ढाका , 24 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेश पोलिसांनी ‘ऑपरेशन डेव्हिल हंट – फेज 2’ अंतर्गत अवघ्या 24 तासांत देशभरातून किमान 663 जणांना अटक केली आहे. ही कारवाई देशातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी तसेच बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली असल्याची माहिती बांगलादेश पोलिसांकडून देण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
बांगलादेश पोलीस मुख्यालयातील सहाय्यक महानिरीक्षक (मीडिया आणि जनसंपर्क) एएचएम शहादत हुसेन यांनी या कारवाईची पुष्टी करताना सांगितले की, ऑपरेशनच्या मागील 24 तासांत 663 जणांना ताब्यात घेण्यात आले असून नऊ बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करून होऊ शकणाऱ्या विध्वंसक कारवायांना आळा घालणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ढाक्यामध्ये पत्रकारांशी बोलताना, अंतरिम सरकारचे गृहविषयक सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. ही बैठक ‘इंकलाब मंच’चे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एक दिवसाने पार पडली होती. ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ची सुरुवात यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. माजी मुक्तिसंग्राम व्यवहार मंत्री ए.के.एम. मोझम्मेल हक यांच्या घरावर 15–16 विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली.
मानवाधिकार संघटना ‘मंधाका संस्कृति फाउंडेशन’ (MSF) च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण बांगलादेशात ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ अंतर्गत 11,313 जणांना अटक करण्यात आली होती. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश लोक सत्तेवरून हटवण्यात आलेल्या अवामी लीग सरकारशी संबंधित होते. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशमध्ये हिंसाचार आणि वाढती राजकीय सूडभावना धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे. युनूस यांच्या शासनकाळात देशात हिंसाचाराची परिस्थिती निर्माण झाल्याचेही म्हटले जात आहे.
गेल्या महिन्यात अवामी लीगने युनूस सरकारवर देशाला अनिश्चित भवितव्याकडे ढकलण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. तसेच, आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना जबरदस्तीने कारागृहात डांबले जात असल्याचा दावाही पक्षाने केला होता. अवामी लीगने असा आरोपही केला होता की, कारागृहात त्यांच्या नेत्यांविरोधात हत्येचे कट रचले जात आहेत. युनूस सरकारवर टीका करताना अवामी लीगने म्हटले आहे की, बेकायदेशीररीत्या सत्तेवर आलेल्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यापासून देशभरात हत्या, बलात्कार, चोरी, दरोडे आणि लुटमारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode