
मॉस्को, 24 डिसेंबर (हिं.स.)।रशियाची राजधानी मॉस्को येथे बुधवारी, 24 डिसेंबर रोजी, पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. वृत्तानुसार, या स्फोटात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वीही असाच स्फोट झाला होता, ज्यामध्ये एका वरिष्ठ रशियन जनरलचा मृत्यू झाला होता.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, हा स्फोट त्या वेळी झाला, जेव्हा दोन वाहतूक पोलीस अधिकारी मॉस्कोमधील येलेत्स्काया स्ट्रीटवर एका पोलीस वाहनाजवळ संशयास्पद व्यक्तीला पाहून त्याच्याशी चौकशीसाठी पुढे गेले. अधिकारी त्या व्यक्तीच्या जवळ पोहोचताच अचानक जोरदार स्फोट झाला.
पोलीस वाहनाजवळ झालेल्या या स्फोटात दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटात पोलीस कारजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीस गंभीर दुखापत झाली होती, मात्र नंतर उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. मॉस्को राज्य वाहतूक निरीक्षण विभागाने मृत पोलीस अधिकाऱ्यांची ओळख लेफ्टनंट इल्या क्लिमानोव (वय 24) आणि मॅक्सिम गोर्बुनोव (वय 25) अशी जाहीर केली आहे.
यापूर्वी, सोमवारी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी, मॉस्कोमध्ये असाच एक स्फोट झाला होता. त्या वेळी झालेल्या कार बॉम्बस्फोटात लेफ्टनंट जनरल फानिल सरवरोव यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मॉस्कोसह रशियाच्या विविध भागांमध्ये युक्रेनकडून रात्रीभर ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनकडून संपूर्ण रात्री हल्ले सुरू होते आणि रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी 172 युक्रेनियन फिक्स्ड-विंग ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode