
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)
अमरावती शहराच्या अधोगतीला भाजप आणि महायुतीचे अपयशी नेतृत्व जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. शहरात लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने त्यांच्या पंटरांनी सट्ट्याची दुकाने उघडून खुलेआम धंदे सुरू केले, असा धक्कादायक आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट बोट ठेवले.डॉ. देशमुख म्हणाले की, एकेकाळी देशात राहण्यासाठी चौदाव्या क्रमांकावर असलेले अमरावती शहर आज शेवटच्या चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. ही अधोगती कोणामुळे झाली, याचे उत्तर भाजप आणि महायुतीने द्यावे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी शहराचा केवळ बट्ट्याबोळ केला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, भाजपच्या काळात प्रत्येक प्रकल्पात टक्केवारीचा खेळ सुरू होता. विकासकामे जनतेसाठी नव्हे, तर कमिशनसाठी राबवली गेली. परिणामी निकृष्ट दर्जाची कामे, अपूर्ण प्रकल्प आणि वाढती नागरिकांची नाराजी पाहायला मिळत आहे.महापालिकेच्या कारभारावर टीका करताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, नागरिकांवर करांचा बोजा वाढवण्यात आला, मात्र त्या बदल्यात कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक सर्वच आघाड्यांवर अपयश आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक वैतागले असून परिवर्तनाची भावना प्रबळ झाली आहे.आगामी अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष सहन करावा लागेल आणि अमरावतीत परिवर्तन निश्चित आहे. भाजप–महायुतीच्या भ्रष्ट व अपयशी कारभाराला जनता धडा शिकवेल, असा ठाम विश्वासही डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. काँग्रेसकडे तिकीट मागण्यासाठी मोठी गर्दी आहे. भाजपविरुद्ध सर्व ८७ जागांवर उमेदवार उभे करणारा काँग्रेस हा एकमेव सक्षम पक्ष आहे. इतर पक्ष आमच्या उमेदवारांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने आणि दबावतंत्रांचा वापर केला जात असल्याचे ही डॉ. सुनील देशमुख म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी