
नामकरण न झाल्याने प्रकल्पग्रस्तांत नाराजी
रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज गुरुवारपासून व्यावसायिक विमानोड्डाणास सुरुवात होत आहे. हा क्षण ऐतिहासिक असला तरी विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला “दि. बा. पाटील” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ जुलै २०२२ रोजी मान्य केला होता. तसेच ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी नामकरणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत पुढील तीन महिन्यांत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.
मात्र हे आश्वासन देऊन दोन महिने उलटून गेले असून, २५ डिसेंबर रोजी विमानतळ पूर्णतः कार्यान्वित होत असतानाही नामकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याच्या निषेधार्थ खासदार सुरेश म्हात्रे यांनी २२ डिसेंबरपासून मानकोली नाका (भिवंडी) ते नवी मुंबई विमानतळ (पनवेल) अशी पायी दिंडी यात्रा काढण्याचे आंदोलन जाहीर केले होते. मात्र महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली आणि आंदोलन स्थगित करावे लागले.
राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले जात असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव अद्याप चर्चेला आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारकडून जाणीवपूर्वक चालढकल होत असल्याचा आरोप होत असून, प्रकल्पग्रस्त व सागरी भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “वेळीच निर्णय न झाल्यास संघर्ष अटळ आहे,” असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. शासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके