
अकोला, 25 डिसेंबर (हिं.स.)।
विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित स्व. सीमाताई शेटे (रोठे) स्मृती समर्पित एकदिवसीय लेखिका संमेलनात मुक्ता पब्लिकेशनचे प्रकाशक सागर लोडम यांचा सन्मान करण्यात आला. मराठी साहित्याचे जतन, संवर्धन व प्रसारासाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
हे संमेलन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी ‘स्व. भाऊसाहेब मांडवगणे साहित्य नगरी’, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. डॉ. भारती सुदामे होत्या. उद्घाटन अभिनेत्री व लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांच्या हस्ते झाले, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखिका सौ. नीलिमा विलास पाटील उपस्थित होत्या.
प्रकाशक म्हणून सागर लोडम यांनी दर्जेदार साहित्य प्रकाशन, वाचनसंस्कृतीचा विस्तार आणि ग्रंथप्रसाराच्या माध्यमातून बौद्धिक व वैचारिक संस्कृती घडविण्यासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मुक्ता पब्लिकेशनद्वारे प्रकाशित झालेल्या अनेक साहित्यकृतींमुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे