श्रीवर्धनमध्ये उद्धव ठाकरे सेनेची रॅली
रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। श्रीवर्धन नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मा. श्री. अ‍ॅड. अतुल चौगुले यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे सेनेच्या वत
Uddhav Thackeray Sena holds grand rally in Shrivardhan; Spontaneous participation of candidates from all parties


रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)।

श्रीवर्धन नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मा. श्री. अ‍ॅड. अतुल चौगुले यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने श्रीवर्धन शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विविध पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला.

रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ही रॅली आंबेडकर भवन, नगरपालिका कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठ, जुना एस.टी. डेपो, डॉ. राऊत चौक, प्रभू आळी, नारायण पाखाडी, गणेश मंदिर आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सोमजाई मंदिर येथे समाप्त झाली. रॅलीदरम्यान विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आशीर्वादही घेण्यात आले.

या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांसह इतर पक्षांतील उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे तसेच राजा ठाकूर यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.

भव्य रॅलीचे नियोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख शिवराज चाफेकर, उपशहरप्रमुख अजिंकेश भाटकर, सागर जाधव तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते. रॅलीदरम्यान संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. या रॅलीमुळे श्रीवर्धनच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande