
जळगाव, 25 डिसेंबर (हिं.स.)महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. दरम्यान, महायुतीतील युतीबाबत सुरू असलेले संभ्रमाचे वातावरण अखेर दूर झाले असून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी जळगाव महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा करून त्यानंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिता वाघ, माजी महापौर नितीन लढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच आमदार अमोल पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून सत्तास्थापनेचा आणि जागावाटपाचा प्राथमिक ‘फॉर्म्युला’ देखील निश्चित झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र महायुतीतील तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संदर्भातील निर्णय अद्याप प्रलंबित असून, राष्ट्रवादीशी स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. राष्ट्रवादीशी चर्चेनंतरच जागांची घोषणा भाजपाचे प्रभारी मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे तसेच शिवसेनेकडील दोन पदाधिकारी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी चर्चा करणार असून, त्या चर्चेनंतर एकूण जागा वाटप निश्चित करून त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीतील युतीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर