
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या अर्जातील संपूर्ण माहिती भरताना उमेदवारांच्या व प्रामुख्याने नवीन उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना ५०० शब्दांपर्यंत निबंधही लिहिण्याची एक अट नामांकन अर्जात नमुद आहे.
नामांकन अर्जात कोणतीही त्रुटी राहू राहिल्यास त्यातील कोणतीही माहिती अर्धवट राहिल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे उमेदवारांना वारकाईने अर्ज भरावा लागत असून, बहुतांश उमेदवारांनी तीन ते चार अर्जाची उचल केली आहे. उमेदवारांना प्राथमिक माहितीसह प्रामुख्याने उत्पन्नाचे सर्व स्त्रोत, कर्जाची माहिती, विविध शासकीय यंत्रणांकडील कराची वा देयकाची थकबाकी, कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाचीही माहिती भरणे आवश्यक आहे: मात्र यंदा काही माहिती अधिकच सविस्तरपणे भरावी लागत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
घरगुती शौचालयाचा वापर करीत असल्याचे स्वयंघोषणापत्राही देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना या विषयावर उमेदवारांना १०० ते ५०० शब्दांपर्यंत निबंधही लिहिण्यास सांगण्यात आले आहे. निबंधाची शब्दमर्यादा कमी असली आणि ते अपेक्षित असले, तरी त्यामुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार वकिलांच्या व खासगी लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आज दिसून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी