
नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ( CPI) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात शताब्दी महोत्सव साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाकपा नाशिक जिल्हा व शहर समितीच्या वतीने नाशिक शहरात भव्य ‘लाल झेंडा मार्च’ काढण्यात आला. या मार्चद्वारे पक्षाचा गौरवशाली इतिहास आणि आगामी संघर्षाचा निर्धार ठामपणे मांडण्यात आला.
या रॅलीची सुरुवात नाशिकमधील ऐतिहासिक ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) येथून झाली. प्रारंभी पक्षाच्या लाल ध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. हे ध्वजवंदन कॉम्रेड देविदास भोपळे, महिला फेडरेशन व बांधकाम कामगार संघटनेच्या कॉम्रेड सौजन्या गोतपागर आणि विद्यार्थी संघटनेचे कॉम्रेड कैवल्य चंद्रात्रे यांच्या हस्ते संयुक्तपणे पार पडले. मार्चदरम्यान “मार्क्सवाद जिंदाबाद”, “लाल बावटा जिंदाबाद”, “शेतकरी–कामगार एकजूट जिंदाबाद”, “फॅसिझम मुर्दाबाद”, “जातीवाद–मनुवाद मुर्दाबाद”, “समाजवाद जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लाल झेंडे, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन शेतकरी, कामगार, महिला आणि युवक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शालिमार, मेहेर चौक मार्गे भारतीय कम्युनिस्ट पक्ष–आयटक कार्यालयापर्यंत पोहोचली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड मनोहर पगारे यांनी केले. त्यांनी पक्षाच्या शंभर वर्षांच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या शंभर वर्षांत शोषित, कष्टकरी वर्गासाठी रस्त्यावरील संघर्षापासून संसदेत आवाज उठवण्यापर्यंत सातत्याने भूमिका बजावली आहे. वाढत्या कॉर्पोरेट भांडवलशाही आणि फॅसिझमच्या विरोधात लढा देण्याच्या ऐतिहासिक जबाबदारीतून हा ‘लाल झेंडा मार्च’ आयोजित करण्यात आला. कॉ. राजू देसले, कॉ. मनोहर पगारे जिल्हा सचिव, कॉ. तल्हा शेख नाशिक सचिव, कॉ. प्राजक्ता कापडणे, कॉ. भीमा पाटील, मीना आढाव आदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV