नाताळाची सुट्टी आणि वाहतुकीची कोंडी
रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)। नाताळ सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले. मात्र या उत्साहाला वाहतुकीच्या कोंडीने ग्रहण लागले. गुरुवारी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई–गोवा महामार्गाव
Christmas holidays and traffic jams


रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)।

नाताळ सण आणि सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले. मात्र या उत्साहाला वाहतुकीच्या कोंडीने ग्रहण लागले. गुरुवारी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई–गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक नियमन पूर्णपणे कोलमडले होते.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. विशेषतः घाट परिसरात वाहतूक कोंडी तीव्र झाली होती. अवघ्या सात ते आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक चांगलेच वैतागले होते. संथ वाहतुकीमुळे घाट परिसरात अनेक वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनाही घडल्या.

दुसरीकडे मुंबई–गोवा महामार्गावरही वाहतूक संथ गतीने सुरू होती. पेण ते वडखळ या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त वाहनचालक लेन शिस्त पाळत नसल्याने कोंडी आणखी वाढत होती. वडखळ ते अलिबाग दरम्यानही वाहतुकीचा वेग मंदावला होता. अचानक वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतूक पोलीस यंत्रणेला नियमन करताना मोठी कसरत करावी लागत होती.

दरम्यान, नाताळ आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. मांडवा, किहिम, अलिबाग, नागाव, मुरुड, काशिद आदी समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. गेट वे ऑफ इंडिया–मांडवा जलवाहतुकीवरही प्रचंड ताण आला असून प्रवाशांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त बोटी सोडण्यात आल्या. हॉटेल्स व लॉजेस हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत अलिबाग परिसरात २० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिल्याचे सांगण्यात येत असून, नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोकण पर्यटन पुन्हा एकदा बहरात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande