
रायगड, 25 डिसेंबर (हिं.स.)।
समाजातील गरजू, दुर्बल व वंचित घटकांना न्यायप्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन व मदत मिळावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या वतीने विधी स्वयंसेवकांसाठी रिफ्रेशर प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड–अलिबाग मा. राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
विधी स्वयंसेवकांनी कायद्याचे अद्ययावत ज्ञान आत्मसात करून समाजातील नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, हा या प्रशिक्षणामागील प्रमुख हेतू होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत असलेले विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश–१, रायगड, उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विधी स्वयंसेवकांची जबाबदारी, लोकअदालतीचे महत्त्व तसेच कायदेविषयक जनजागृतीची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मनोगत व प्रशिक्षणाची भूमिका जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी मांडली.
प्रशिक्षण सत्रात माननीय ॲड. मनीषा नागावकर, ॲड. उषा पाटील, ॲड. हिना तांडेल, ॲड. तनुष्का पेडणेकर आदी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध कायदे, शासकीय योजना, मोफत विधी सेवा, महिलांशी संबंधित कायदे तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर सखोल मार्गदर्शन केले. यामुळे स्वयंसेवकांना प्रत्यक्ष कामकाजात उपयोगी ठरणारी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके